🔹लता मंगेशकर यांना 'बंग भूषण' जाहीर
बंगाल सरकारतर्फे दिला जाणारा 'बंग भूषण' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार गानसम्राज्ञी 'भारतरत्न' लता मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबईत येऊन लतादीदींना हा पुरस्कार प्रदान करणार आहेत.
बंगाली संगीतातील योगदानाबद्दल लतादीदींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वत: एका फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. 'लतादीदींनी पुरस्कार स्वीकारण्याची तयारी दाखवल्यानं मला प्रचंड आनंद झाला आहे. त्यांचा सन्मान ही आमच्यासाठीही गौरवाची बाब आहे,' असं ममतांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी २० ऑक्टोबर रोजी मुंबईत येऊन लतादीदींना सन्मानित करतील. 'सारेगम'चे अध्यक्ष संजीव गोएंका हेही त्यांच्यासोबत असतील.
🔹सीफूड निर्यात करण्यात भारत जगात सातवा
विशाखापट्टनम - सीफूड निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत जगात सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य ( स्वतंत्र पदभार ) राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली .
विशाखापट्टनम येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय सीफूड प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या . " सागरी उत्पादनांच्या व्यावसायिकांनी या क्षेत्रात मोठा व्यवसाय दिसल्याने आज या क्षेत्राला भरभराट मिळाली आहे . त्यामुळे याचे श्रेय मी त्यांनाच देते . त्यांच्याशिवाय सीफूड करण्यात भारत जगात सातव्या क्रमांकावर पोचला नसता . '
सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण ( एमपीईडीए ) आणि भारतातील सीफूड निर्यात संघटनेने ( एसईएआय ) या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे . या प्रदर्शनाला केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री एम . वेंकय्या नायडू आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन . चंद्राबाबू नायडू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते . स्थानिकांसह निर्यातीच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित आणि शाश्वत भारतीय सागरी उत्पादने घेणे हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे .
🔹पाच पक्षांची नोंदणी रद्द
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावूनही वार्षिक विवरणपत्र व लेखापरीक्षण अहवाल सादर न करणाऱ्या पाच राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे .मान्यता रद्द करण्यात आलेल्या पक्षांमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दल , ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, राष्ट्रीय जनता दल , ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पाच राजकीय पक्षांचा समावेश आहे .
या राज्यस्तरीय पक्षांना 26 ऑगस्ट 2016 रोजी अंतिम नोटीस बजावण्यात आली होती . तत्पूर्वी अनेकदा त्यांना कागदपत्रे सादर करण्याबाबत लेखी विनंतीही करण्यात आली होती ; परंतु त्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी आता रद्द करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे .
🔹सीमेवरील कुंपणाबाबतचे नैपुण्य भारताला देण्यास इस्रायल तयार
भारत व इस्रायल या दोन्ही देशांपुढे अनेक बाबतीत ‘समान आव्हाने’ असल्याचे सांगून, सीमेवरील कुंपण मजबूत करण्यासाठी आपल्याकडील विशेष नैपुण्य भारताला उपलब्ध करून देण्याची तयारी इस्रायलने दर्शवली आहे.
गेल्या आठवडय़ात उरी येथे हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कॅरमन यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
सध्याच्या घडामोडींकडे आपला देश काळजीने बघत असून, दहशतवादाच्या विरोधातील सहकार्य हा द्विपक्षीय संबंधांचा कायम घटक राहील, असे कॅरमन म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या यापूर्वीच्या इस्रायल दौऱ्यात त्यांना देशाची सीमेवरील तयारी दाखवण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.
इस्रायलला नेहमीच धोका राहिलेला असल्यामुळे आमच्याजवळ याबाबतचे विशेष नैपुण्य आहे. आमच्यासमोरील आव्हाने समान असून आमच्याकडे त्यासाठी उपायही आहेत. त्यामुळे याबाबत आपण एकत्र काम करू शकतो. यापूर्वी आम्ही इतर क्षेत्रात सहकार्य केले असून ते याही क्षेत्रात केले जाऊ शकते, असे तेल अवीव येथे होऊ घातलेल्या एचएलएस व सायबर परिषदेची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कॅमेरून यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment